मुलासाठी अजित पवार यांचा सेफ गेम?पार्थ पवार यांना राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना राजकारणात रिलाँच करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कसं होणार आहे हे रिलाँचिंग?
Parth Ajit Pawar : मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पार्थ पवारांना राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न केला खरा.. मात्र लोकसभेला पार्थ यांचा सपाटून पराभव झाला. आता पार्थ पवारांच्या रिलाँचिंगची तयारी सुरु आहे. पार्थ पवार यांच्या राजकारणातल्या एंट्रीसाठी अजित पवारांनी सुकर आणि सुरक्षित मार्ग निवडल्याची चर्चा आहे. पवार कुटुंबाचं वर्चस्व असणा-या सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवारांना राजकारणात आणण्याची तयारी सुरु झालीय. पार्थ पवार जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय.
पार्थ पवारांचं रिलाँचिंग कसं?
अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक 8 नोव्हेंबरला होणार आहे. संचालकपदाच्या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल आहे. दरम्यान संचालकपदासाठी अजित पवार सांगतील त्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती बँकेचे संचालक आणि अजित पवार समर्थक दत्तात्रय भरणेंनी दिलीय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यापूर्वीच सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवार राजकारणात येतील असं बोललं जातंय..
सहकार चळवळ रुजवण्यात पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिलीय.. त्यामुळेच सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवार यांना राजकारणात आणलं जाईल अशी शक्यता वर्तवली जातेय.. मावळच्या पराभवामुळे यावेळी दादा कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्याचंही बोललं जातंय..
लोकसभेला अजित पवार गटाच्या वाट्याला मोजक्याच जागा येऊ शकतात. त्यामुळे पदरी पडलेल्या जागा जिंकून आपली शक्ती वाढवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनंच लोकसभेसाठी नवीन चेह-यांना अजित पवार संधी देऊ शकतात. विशेषत: राज्यात लोकप्रिय असणा-या नावांना लोकसभेसाठी संधी दिली जाऊ शकते. यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात.
सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचारही अजित पवार करत असल्याची माहिती आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात अभिनेते अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सहकार मंत्री वळसे पाटलांना संधी मिळू शकते.
साता-यात शरद पवार यांचे खास-विश्वासू अशी ओळख असणा-या श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात रामराजे नाईक निंबाळकर किंवा नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून पसंती मिळू शकते.. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याविरोधात विधानपरिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचनाही पक्षाने दिल्याचे समजतंय
तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसमध्ये असेलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना उतरवलं जाणार अशी चर्चा आहे. त्यांच्या प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दोन बैठकही झाल्या असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही राज्यातील चारपैकी 3 खासदार अजूनही शरद पवारांसबोतच आहेत. सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे लोकसभेतील ताकद वाढवण्यासाठी स्मार्ट खेळी खेळण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्यापेक्षा आधीच घोषणा करुन प्रचारात आघाडी घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय..