सगरच्या निमित्तानं हल्यांचा सामूहिक छळ
दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रेड्यांची म्हणजेच हाल्यांची सगर साजरी करण्याची प्रथा दुग्ध व्यावसायिकांमध्ये आहे.
पुणे : दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रेड्यांची म्हणजेच हाल्यांची सगर साजरी करण्याची प्रथा दुग्ध व्यावसायिकांमध्ये आहे. खरंतर आपल्या गोठ्यातील जनावराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण.
मात्र या सणाला हल्ली हिडीस स्वरूप आल्याचं म्हणावं लागेल. सगरच्या निमित्तानं हल्यांचा जो सामूहिक छळ केला जातो तो खरोखरच संतापजनक आहे.
फटाक्यांच्या आवाजानं बिथरलेला हाल्या
हाल्यांचे हाल दाखवण्यासाठी ही दृश्ये पुरेशी आहेत. आपली जनावरं हे आपलं धन आहे. त्यांच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या सणामागचा उद्देश...
पण इथं वेगळंच घडतय. पाडव्याच्या दिवशी हाल्यांची पूजा केली जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी हाल्यांना छान सजवलं जातं. त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. इथवर सर्व ठीक आहे. मात्र हाल्यांच्या ऋणातून मुक्त होण्याच्या नादात आपण त्यांचा किती छळ करतोय याचं भान कुणालाच उरत नाही.
काठीच्या सपाट्यानी उधळलेला हाल्या
पुण्याच्या गणेश पेठेत ही सगर आयोजित केली जाते. दुग्धव्यवसायिक तसेच शहरातील मान्यवर त्यात सहभागी होतात. या ठिकाणचा उत्साह इतका दांडगा असतो की सगळेच जणू जनावरांप्रमाणे वागू लागतात. आज देशात सर्वत्र मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला जातोय. मात्र तो आवाज अजून इथवर पोचला नसल्याचं म्हणावं लागेल.