`साहेब म्हणायचे, राष्ट्रवादी ही हरामखोर पार्टी` - एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले...
Dasara Melava: उद्धव ठाकरे गटाचा 'एकनिष्ठ' मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतोय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा हिंदूत्ववादी मेळावा बीकेसी मैदानात होतोय. शिवाजी पार्क व्यासपीठावर 'आम्ही एकनिष्ठ' असा बॅनर लागला. तर बीकेसी व्यासपीठावर 'गर्व से कहो हम हिंदू है' असा बॅनर झळकतोय. एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde Dasara Melava) भाषण करताना उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीला देखील टोले लगावले आहेत.
हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला. तो तुम्ही तुमच्या वैयक्तित, राजकीय फायद्यासाठी, महत्वाकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
तुम्ही त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवू लागलात. बाळासाहेबांनी हरामखोर म्हणून ज्या पक्षांचा उल्लेख केला त्या पक्षांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाली असेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीवर देखील तोंडसूख घेतलं.
बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती. पण राजकारणात बाळासाहेबांनी कधी दोस्ती मध्ये आणली नाही. एकीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होतं आणि आमचे पक्षप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका निभावत होते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्धानंतर आता राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.