COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : बातमी श्रीमंत फकिराची, शिर्डी संस्थान स्थापन होऊन आज नव्वद वर्षं झाली. पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये.  आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. 


दानपेटी आता मात्र भरभरुन वाहत आहे


आयुष्यभर फकीर होऊन राहिलेल्या साईबाबांसमोरची दानपेटी आता मात्र भरभरुन वाहत आहे. गेल्या ९० वर्षांत साईबाबा संस्थानला घवघवीत दान मिळालंय. 
शिर्डीत साज-या होणा-या उत्सव आणि सलग सुट्यांच्या काळात सुमारे चार कोटींच्या वर दान जमा होतं.


वर्षभरात २८८ कोटींच दान जमा


साईंच्या दानपेटीत गेल्या वर्षभरात २८८ कोटींच दान जमा झालंय. या व्यतिरिक्त २४ किलो सोनं आणि ३८५ किलो चांदीचाही समावेश आहे.


सन १९१८ साली उत्पन्न केवळ २३०० रुपये 


साईबाबांचं महानिर्वाण सन १९१८ साली झालं. त्यानंतर दोन वर्षांनी शिर्डीत साई मंदिराच्या देखरेखीसाठी साईबाबा संस्थानची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळी शिर्डीच्या साई संस्थानचं उत्पन्न केवळ २३०० रुपये इतकं होतं. पण गेल्या ९० वर्षांत संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. 


साई संस्थानकडे ४०० किलो सोनं


साई संस्थानकडे असलेली गंगाजळी आता २१०० कोटीच्या जवळपास जावून पोहोचलीय. साई संस्थानकडे ४०० किलो सोनं आणि साडे चार हजार किलो चांदी जमा आहे.


वार्षिक उत्पन्न साधारणतः ४०० कोटी


या व्यतिरिक्त संस्थानची स्थावर आणि जंगम मालमत्ताही मोठी आहे. साईबाबा संस्थानचं वार्षिक उत्पन्न साधारणतः ४०० कोटी रुपयांच्यावर जातं.  १९२० च्या दरम्यान, साईसंस्थानकडे असलेली तांब्या पितळ्याची भांडी बदलून चांदीची करण्यात आली.


संस्थानमार्फत शिर्डीत दोन रुग्णालयं


या सगळ्या उत्पन्नातून साई संस्थानमार्फत शिर्डीत दोन रुग्णालयं चालविली जातात. साई संस्थान शिर्डी नगरपालिकेलाही विकास कामा साठी निधी देतं. गेल्या ९० वर्षांतला साई संस्थानचा प्रवास आणि उत्कर्ष थक्क करणारा आहे. श्रद्धा आणि सबुरीवरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होतोय.