शिर्डी बंदने भक्तांचे हाल, मदतीला धावलं साईंचं प्रसादालय
शिर्डी बंदमुळे साईंच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भक्तांचे हाल झाले.
योगेश खरे, झी मीडिया, शिर्डी : शिर्डी बंदमुळे साईंच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भक्तांचे हाल झाले. शिर्डीत हॉटेल्स, लॉज आणि बाजारपेठ बंद असल्यानं भाविकांची मोठी धावाधाव झाली. साईंचं प्रसादालयानं भक्तांना आधार दिला.
शिर्डीकरांनी बंद पुकारल्यानं साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे हाल झाले. वार कोणताही असो, शिर्डीत साईच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भक्त येतात. शिर्डी बंद असल्यानं अनेक भक्तांना राहण्यासाठी खोली मिळाली नाही. शिवाय हॉटेल्स बंद असल्यानं भक्तांचे खाण्यापिण्याचे हाल झाले.
अडचणीत भक्तांच्या मदतीला साईंचं प्रसादालय धावून आलं. प्रसादालयात आज ५० हजार अतिरिक्त नास्त्याची पाकिटं बनवण्यात आली होती. शिवाय जेवणाचीही जादा व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळं अडचणीत असलेल्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला.
शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदबाबत अनेक भक्तांना माहितीच नव्हती. त्यामुळं अनेक भक्तांना राहण्याखाण्याची सोय करण्यासाठी मोठी धावाधाव करावी लागली. साईदर्शन निर्विघ्न झालं एवढीच काय जमेची बाजू होती.