चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याचं आईकडून वर्षश्राद्ध, गट्टेपल्लीत बांधली समाधी
वरवर पाहाता आपल्या कुटुंबातल्या एखाद्या दिवंगत व्यक्तीविषयी अशा प्रकारे प्रेम व्यक्त केलं असलं तरी...
आशिष अम्बाडे, झी २४ तास, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गतवर्षी कसनासूर येथील चकमकीत ४० नक्षलवादी मारले गेले होते. यात मारला गेलेला जहाल नक्षली साईनाथ उर्फ डोलेश मादी आत्राम याची चक्क समाधी बांधण्यात आलेली दिसतेय. अहेरी तालुक्यात गट्टेपल्ली इथं ही समाधी बांधण्यात आलीय. साईनाथची आई तानी मादी आत्राम हिने नुकतंच साईनाथचं वर्षश्राद्धही घातलं. निमंत्रण पत्रिका छापून या तेरव्याच्या कार्यक्रमाला लोकांना आमंत्रणही देण्यात आलं होतं.
वरवर पाहाता आपल्या कुटुंबातल्या एखाद्या दिवंगत व्यक्तीविषयी अशा प्रकारे प्रेम व्यक्त केलं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना लक्षात घेता यातून नक्षलवादाला प्रोत्साहन तर मिळत नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होतोय. नक्षलवादाचं हे उदात्तीकरण असल्याची भावनाही यातून जागृत होऊ शकते.
काही स्वयंसेवी संस्थानी ग्रामस्थांच्या मदतीनं अशा काही समाधी उद्ध्वस्त केल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा पोलिसांपुढे या समाधीने नवं आव्हान उभं केलं आहे. अलीकडे नक्षली हिंसक कारवायांमुळं जिल्हा ढवळून निघाला असतानाच, ही घटना समोर आल्यानं नक्षली किती वेगळ्या पद्धतीनं काम करीत आहेत, हे दिसून येतं.
दरम्यान, काल एटापल्ली तालुक्यात घोटसुर इथं दोन वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. आज त्याची छायाचित्रे समोर आली आहेत. रस्ता बांधकामाला नक्षल्यांचा किती विरोध सुरू आहे, हे अलीकडच्या घटनांवरून दिसून आलं.