कोल्हापूर : गेल्या वर्षी आलेल्या महापुराचा कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला होता. हेमाडपंती कोपेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या खिद्रापूरकरांचं देखील प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे त्यांच्या मदतीला अभिनेता सलमान खान धावून आला आहे. गतवर्षी महापुरात पडझड झालेल्या ७० घरांचे बांधकाम तो करून देणार असून त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. महापुरामध्ये वाहून गेलेले घर परत मिळणार म्हणून येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऐलान' फाउंडेशनच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचा शब्द दिला आणि या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच झाला.


महापुरात नुकसान झालेल्या घरांसाठी राज्यसरकारने प्रत्येकी ९५ हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. बांधकामासाठी उर्वरित खर्चाची जबाबदारी सलमान खानने घेतली आहे. याबद्दल गावचे सरपंच हैदरखान मोकाशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


ते म्हणाले, 'आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात असलेल्या एका गावाची दखल सलमान खानने घेतल्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे.' काही  महिन्यांमध्ये ही घरं पूर्ण तयार झाल्यानंतर स्थानिकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत.