न्यायालयाच्या आवारातच भिडेंच्या धारकऱ्यांची मीडियासमोर मुजोरी
संभाजी भिडेंना जामीन मंजूर
नाशिक : नाशिकच्या जाहीर सभेत आंबा खाल्ल्यानं मुले होतात असा अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंना सशर्त जामीन मंजूर झालाय. मात्र, यानंतर नाशिक न्यायालयातून बाहेर पडणाऱ्या भिडेंच्या धारकऱ्यांची माध्यमांसोबत झटापट झाली. पत्रकारांना हाताला धरून धारकरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते... इतकंच नाही तर कॅमेऱ्यांना सामोरं जात पत्रकारांना वृत्तांकन न करण्याची दमबाजीही करण्यात आली. त्यामुळे, माध्यमांच्या प्रतिनिधींशी धारकऱ्यांसोबत झटापट झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत धारकऱ्यांच्या मुजोरीविरोधात कारवाईचा इशारा दिला...
गेल्या सहा महिन्यांपासून न्यायालयानं वॉरंट बजावूनही संभाजी भिडे हजर होत नव्हते. अखेर आज त्यांना न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यासह जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
गुन्हा अजून सिद्ध व्हायचाय... तसंच संभाजी भिडेंचं वय (८७ वर्ष) लक्षात घेता जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी संभाजी भिडेंचे वकील अविनाश भिडे यांनी न्यायालयासमोर केली होती... ती न्यायालयानं मान्य केलीय.