योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आंबा खाल्ल्यानं मुलं होतात, असं वादग्रस्त वक्तव्य करणारे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे अखेर नाशिकच्या न्यायालयात हजर झाले... त्यांना न्यायालयानं जामीनही मंजूर केलाय. पण या प्रकरणातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा भिडेंनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या सभेतलं आंब्याचं वक्तव्य संभाजी भिडेंच्या अंगलट आलंय... 'माझ्या बागेतला आंबा खाल्ल्यानं मुलं होतात', असा दावा त्यांनी जाहीर भाषणात केला होता. याप्रकरणी गर्भधारणा पूर्व निदान कायद्यानुसार भिडेंवर अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. या कायद्यानुसार आरोप सिद्ध झाल्यास भिडेंना ३ वर्षं कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते... 


मात्र याप्रकरणी वारंवार वॉरंट बजावूनही संभाजी भिडे न्यायालयात हजार झाले नव्हते. मात्र त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी ते कडेकोट बंदोबस्तात शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. त्यांनी वकिलामार्फत जामिनासाठी अर्जही केला. न्यायालयानं १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.
 
न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर संभाजी भिडेंनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. हा गुन्हा म्हणजे अंधारात काळं मांजर शोधण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून, यातून काहीही साध्य होणार नाही, असंच जणू त्यांनी सूचित केलं.
 
या प्रकरणी आता येत्या १४ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. संभाजी भिडेंबाबत न्यायालय काय निर्णय घेतं, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.