सांगली: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने उडी घेतली आहे. आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी चौगुले यांनी म्हटले की, काहीजण इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. पण सरकारने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व ताकदीने रस्त्यावर उतरेल.


हभप इंदुरीकर महाराज यांच्याकडून 'सम-विषम वादावर' अखेर दिलगिरी


इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य अभ्यासपूर्ण होते. आपले प्राचीन ग्रंथ, वेध, उपनिषेध या सगळ्याचा अभ्यास करुन इंदूरीकर महाराजांनी हिंदू धर्मातील एक बाजू मांडली. त्यांच्या किर्तनातील मोजक्या भागाचा विपर्यास करून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांची बदनामी केली जात आहे. मात्र, आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे नितीन चौगुले यांनी सांगितले. 


इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर आता राज्यमंत्री बच्चू कडूंची प्रतिक्रिया


दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई आज नगरमध्ये आल्या होत्या. मुख्यमंत्री, अनेक मंत्री तसेच काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांने हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू. इंदुरीकर महाराज महिलांबद्दल जे काही बोलत आहेत, त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत, त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी तृप्ती देसाई यांनी केली.  इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला.  परंतु, यावेळी देसाई यांना सुप्याजवळ काही वारकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला.