मुंबई: 'चला हवा येऊ द्या' Chala Hawa Yeu Dya या कार्यक्रमातील निलेश साबळे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या कलाकारांविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडने या तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलेश साबळे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाच्या सोमवारी प्रसारित झालेल्या भागात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजी गायकवाड यांच्या प्रतिमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आल्याचा आक्षेप काहीजणांनी घेतला होता. यावरून बराच गदारोळ झाला होता. निलेश साबळे यांच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या छायाचित्राचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याबद्दल निलेश साबळे यांनी माफी मागावी, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता. यानंतर शनिवारी निलेश साबळे यांनी फेसबुकवर व्हीडिओ पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


खरंतर ते स्कीट आणि तो फोटो एका वेगळ्या अर्थाने एका वेगळ्या कारणासाठी दाखवण्यात आला होता. पण, त्यामुळे वाद आणि गैरसमजही निर्माण झाले. त्यातून कोणत्याही महापुरुषांचा किंवा महान व्यक्तींचा अनादर करण्याचा हेतू नव्हता आणि नसेलही. छत्रपती राजर्षी शाहू महाराज असो किंवा या देशातील सर्व महान व्यक्ती, त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे, असे साबळे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, यानंतरही हा वाद शमायला तयार नाही.