342 वा संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा
मर्दानी राजा या संकल्पनेवर आधारित या वर्षीचा सोहळा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शंभूभक्तांची हजेरी
रायगड : शिवकाळापासून कुस्तीला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि राजाश्रय या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती संभाजी राजांच्या 342 व्या राज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पडला. ढोल ताश्याच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषा करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या हजारो शिव शंभूभक्त आणि कुस्तीतील दिग्गजांच्या साक्षीने हा सोहळा संस्मरणीय झाला.
शंभूछत्रपती राज्याभिषेक समितीच्यावतीने आयोजित या सोहळ्याला शिवसमाधीपासून संभाजी महाराजांची प्रतिमा पालखीत ठेवून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुढे शिरकाईदेवी मंदिर, होळीचा माळ आणि पुढे राजसदरेपर्यंत ही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि 'छत्रपती संभाजी महाराज की जय' च्या घोषणांनी दणाणला.
पोलिस प्रशासनाच्या वतीने स्वामी, रायगडचे उपअधीक्षक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शाल आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर राज सदरेवर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार, हिंदकेसरी मल्ल संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील, कुस्ती सम्राट अस्लम काझी, कर्नाटक केसरी घडवणारे वस्ताद अरुण कुमाकले आणि राष्ट्रीय पदक विजेती पै वेदांतीक पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला राज्यातील आणलेल्या 11 नद्यांच्या जलाने अभिषेक करण्यात आले.
मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने गौरविण्यात आलं. याप्रसंगी अमर साळुंखे यांच्या रायगड ते जिंजी, रवी मोरे यांच्या संताजी घोरपडे, मलकतमदार या पुस्तकांचे मुखपृष्ठ अनावरण राज सदरेवर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.