Sambhaji Raje Post for Shahu Chhatrapati : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत देशभरातील 58 उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील 7 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरमधून (Kolhapur LokSabha) शाहू महाराज छत्रपती यांना तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. काँग्रेसने जाहीर केलेल्या जागांमध्ये नंदूरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर, आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. कोल्हापुरातून काँग्रेसने मोठा डाव खेळला असून शाहू महाराजांना (Shahu Chhatrapati) तिकीट दिलंय. अशातच शाहूंना तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंनी खास पोस्ट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले संभाजीराजे?


अभिनंदन बाबा... गेले तीन दिवस शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेलं, अशी भावना संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.


बातमी कळताच, लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलं, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.


खरंतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे.  कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.


दरम्यान,  अमरावतीमधून बळवंत वानखेडे, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, काँग्रेसने नंदूरबारमधून जी. के. पाडवी, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केलीये. त्याचबरोबर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना देखील लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार? असा सवाल देखील विचारला जात आहे. 


फडणवीस म्हणतात...


मविआ जर उदयनराजेंना साताऱ्यातून बिनविरोध निवडून आणत असेल तर आम्हीली शाहू महाराजांबाबत विचार करू, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय. शाहू महाराजांच्या घरात अनेकांनी यापूर्वी निवडणुका लढवल्या आहेत आणि एकमेकांविरोधातही लढवलेल्या आहेत. त्यामुळे हे राजकारण असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.