Sambhajiraje Chhatrapati Bhosale: संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीराजेंना सामावून घेण्याची तयारी दर्शवली होती. पण यासाठी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश कऱण्याची अट घालण्यात आली होती. दरम्यान संभाजीराजेंनी गुरुवारी सायंकाळी स्वत:च्या स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची पोस्ट शेअर करत चर्चांना पूर्णविराम दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर संभाजीराजे नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याबद्दल उत्सुकता होती. दरम्यान त्यांनी आपण कोल्हापूरमधूनच (Kolhapur) निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभेला कोल्हापूरमधूनच रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी ते नाशिकमधून निवडणूक लढणार की कोल्हापुरातून याबाबत संभ्रम होता. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. संभाजीराजे उद्यापासून मतदारसंघाचा दौरा सुरू करणार आहेत. 


'स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम'


गुरुवारी संभाजीराजेंनी पोस्ट शेअर करत "स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे. स्वत:च्या स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम," असल्याचं स्पष्ट केलं. 



महाविकास आघाडीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. इतकंच नाही तर महाविकास आघाडीत समावेश कऱण्याची तयारीही दर्शवली होती. पण यासाठी त्यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिकीट पाहिजे असेल तर संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करावा लागेल, अशी अट ठेवण्यात आली होती. यानंतर संभाजीराजे कोणत्या पक्षाची निवड करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान संभाजीराजेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे.