आडनावाच्या वादानंतर संभाजीराजेंचा Gautami Patil ला पाठिंबा; ठाम भूमिका मांडत म्हणाले...
Sambhajiraje chhatrapati on Gautami Patil Dance : गौतमी पाटील हिचा डान्स याआधी वादात सापडला होता. आता तिच्या आडनावावरुन वाद सुरु झाला आहे. यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
वाल्मिक जोशी, जळगाव : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्यात नवा वाद सुरु झाला. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. या प्रकरणावर आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. फक्त महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. म्हणूनच गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळाले पाहिजे, हे या मी मताचा आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
शिवाजी महाराजांचे समुद्रातील किल्ले जगात कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई राजधानी ते छत्रपतींची रायगड राजधानी असे जल पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करून याबाबत लवकर निर्णय घेऊन बैठक घ्यावी व जल पर्यटन सुरू करावे अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान गडकिल्ल्यांची देखभाल हा राज्य व केंद्र सरकारसाठी शेवटचा मुद्दा असल्याची खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तसेच जुने स्मारक व किल्ले जिवंत ठेवण्यासाठी वेगळे महामंडळ किंवा दुसरा पर्याय करणे अपेक्षित असल्याचे मत देखील संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.
संभाजीराजे यांची सरकारवर टीका
राज्यात खालच्या पातळीवर राजकारण केलं जात असून त्यामुळे मोठा दुरावा निर्माण झाला आहे. खोके बोके मांजर डुकरे कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र घडावा ही लोकांची अपेक्षा असून स्वराज्य संघटना हा दुरावा भरून काढणार असल्याचा विश्वास छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केला आहे. देशातील इतर राज्यांमध्ये जातीवर राजकारण केलं जातं, मात्र तो प्रकार महाराष्ट्रात होऊ नये. आपल्या महापुरुषांनी जाती विषमता दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले मात्र तसे प्रयत्न आता होत असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली आहे.
नव्या संसदभवन सोहळ्यावर संभाजीराजेंचा टोला
नव्या संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांबरोबर राष्ट्रपती उपस्थित असत्या तर कार्यक्रमाची गरिमा अधिक वाढली असती, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी जळगाव येथे बोलताना व्यक्त केले आहे. दरम्यान मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे म्हणून मला कार्यक्रमाला बोलवावं ही माझी अपेक्षा देखील नसल्याचे मत यावेळी संभाजी राजेंनी व्यक्त केले .