`डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं`; समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांकडून शिंदे - फडणवीसांचे कौतुक
Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताच लोकांनी त्यांनी टाळ्यांनी दाद दिली
Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं आहे. यासोबतच पंतप्रधानांनी मेट्रो, नागपूर रेल्वे स्टेशन, वंदे भारत एक्सप्रेस, एम्स रुग्णालय सारख्या विविध प्रकल्पाचे देखील पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंदे - फडणवीस सरकारचे जोरदार कौतुक केले. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी मराठीतून (pm modi marathi) सुरुवात केली.
'आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन. 11 डिसेंबरचा आजचा दिवस संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आहे,' अशी पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात करताच सर्वांनी टाळ्यांनी त्यांना दाद दिली.
डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं
"आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण 24 जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
2017 मध्ये गोसेखूर्द प्रकल्पाचे काम वेगाने
"30-35 वर्षांपूर्वी या धरणाचं भूमीपूजन करण्यात आलं. त्यावेळी 400 कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण उशीर झाल्यामुळे गोसेखूर्द प्रकल्पाचा अंदाजे खर्च 400 कोटींहून 18 हजार कोटींवर गेला. 2017 मध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर या धरणाचं काम वेगाने सुरु आहे. सर्व समस्या सोडवण्यात आल्या आहेत. या वर्षी हे धरण पूर्ण भरलं याचा आनंद आहे. यासाठी तीन दशकांहून अधिकचा काळ लागला. त्यानंतर शेतकरी, गावांना याचा लाभ मिळत आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.