सांगलीत अघोरी प्रकार! अंधश्रद्धेतून जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले; आठवड्याभरात...
Sangali News Today: सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावामध्ये एका लिंबाच्या झाडाला मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड लटकवाल्याचा प्रकार समोर आला होता.
Sangali News Today: महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी म्हणून ओळखले जाते. मात्र, आत्ताच्या 21व्या शतकातही राज्याला अंधश्रद्धेचा विळखा बसलेला पाहायला मिळतोय. सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावात तासगाव रस्त्याकडल्या एका झाडाला अमावस्येच्या दिवशी एक जिवंत बोकड झाडाला उलटा टांगलेला स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मागील आठवड्यात दर्श सोमवती अमावस्या होती. त्या दिवशी अज्ञात व्यक्तीने अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला लिंबाच्या झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही घटना कवलापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली विभागाला कळवली.
ही घटना समोर आल्यानंतर अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली. तेव्हा त्यांना तासगाव रोड पासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्षे वयाचे, अंदाजे दहा किलो वजनाचे बोकडाचे मागील दोन पाय रस्सीने बांधून त्याला उलटे टांगून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड तसेच राहिल्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार अमावस्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणी तिथेली शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की पाडव्याच्या आदल्या दिवशी असणाऱ्या सोमवती अमावस्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या पूर्वी ही कवलापूर मध्ये मागील महिन्यात कवलापूर येथील रसूलवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकार केला गेला होता.
कोणीतरी मांत्रिकाच्या किंवा देवरुर्षी च्या सल्ल्यानुसार हा अमावस्येच्या दिवशी प्रकार केला असावा, अशी शक्यता अंनिसने व्यक्त केली आहे. जिवंत बोकडाला झाडाला उलटे टांगून अघोरी पद्धतीने बळी देणे. ही अत्यंत अमानवी, अघोरी प्रथा आहे, असे कृत्य करणाऱ्या वर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.