`ते` शेतकरी कुटुंब शपथविधीच्या मंचावर, मुख्यमंत्री ठाकरेंचा हात जोडून नमस्कार
शेतकरी दाम्पत्याची भेट घेत त्यांना दोन्ही हात जोडून आदरपूर्वक नमस्कार केला.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. पण मंचावर एक छोटासा प्रसंग घडला ज्याच्याकडे साऱ्यांच्याच नजरा खिळून राहील्या. एक शेतकरी कुटुंब शपथविधीवेळी मंचावर उपस्थित होते. कारभाऱ्याच्या हातात विणा तर कारभारीण डोक्यावर तुळस घेऊन उभी होती. उद्धव यांचा शपथविधी सोहळा त्यांना याची डोळा...जवळून पाहायचा होता...यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. तुम्ही मंचाजवळ नाही तर मंचावर असाल असा शब्द उद्धव ठाकरे यांनी या शेतकरी दाम्पत्याला दिला होता. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो शब्द पाळत त्या शेतकरी दाम्पत्याची भेट घेत त्यांना दोन्ही हात जोडून आदरपूर्वक नमस्कार केला.
उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यादरम्यान संजय सावंत आणि रुपाली सावंत या शेतकरी दाम्पत्याची भेट झाली होती. हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभे करा, अशी विनंती संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. सोशल मीडियावर या प्रसंगाची चांगलीच चर्चाही झाली होती.
शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेटस्
* शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच निघून गेले.
* महाराष्ट्रात 'ठाकरे राज'; उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांचा शपथविधी संपन्न
* काँग्रेसच्या नितीन राऊत यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
* काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
* राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
* शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
* एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकरेंना स्मरून घेतली मंत्रिपदाची शपथ
* शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
* उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.... महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री