Sangali Loksabha Election 2024 : सांगली कुणाची? यावरून महाविकास आघाडीत सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. शिवसेना ठाकरे गटानं महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी परस्पर जाहीर केली आणि वादाची ठिणगी पडली. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटलांना (Vishal Patil) उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेस नेत्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत खेटे घातले. विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवले. मात्र त्यांच्या पदरात निराशाच पडली. त्यातूनच सांगली (Sangali Politics) काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रहार पाटील म्हणतात...


माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावं. मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही, असं म्हणत चंद्रहार पाटलांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात भावना व्यक्त केली आहे.


विशाल पाटलांचं विमान पायलट विश्वजीत कदम यांच्यामुळं भरकटत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली. त्यामुळं आगीत तेल ओतलं गेलं. महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यावर काँग्रेसनं बहिष्कार घातला. नाराज कार्यकर्त्यांनी सांगली काँग्रेस भवनावरील काँग्रेस हा शब्दच पुसून टाकला. आता तर विशाल पाटलांनी थेट बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. 16 एप्रिलला शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा त्यांनी केलीय. त्यांच्या या बंडाला आमदार विश्वजीत कदमांचं पाठबळ असल्याची चर्चा आहे.


सांगलीच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरोधात काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांनी शड्डू ठोकलाय. त्यांनी हे बंड मागे घ्यावं, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांना नागपुरात तातडीची बैठक बोलावलीय. काँग्रेस नेते आघाडीचा धर्म पाळणार का? विशाल पाटलांनी बंडखोरी कायम ठेवल्यास काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र सांगलीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झालीय, हे मात्र नक्की...!


सांगलीचं राजकीय गणित


राजकीयदृष्ट्या सांगली म्हणजे काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला... 2009 मध्ये काँग्रेसच्या प्रतीक पाटलांनी अपक्ष उमेदवार अजित घोरपडेंचा 39 हजार मतांनी पराभव केला. मात्र, 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचं कमळ फुललं... भाजपच्या संजयकाका पाटलांनी काँग्रेसचे तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटलांचा सव्वा दोन लाख मतांनी पाडाव केला. 2019 मध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढतीत संजयकाकांनी स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना मात दिली होती.