सांगली : जोरदार वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. मतकुणकी गावातील नाईक वस्तीवर काळजाचा चटका लावणारी घटना काल घडली. पत्र्याच्या आडयाला बांधलेल्या ६ महिन्याच्या बाळासह पाळणा उडाल्याने बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील मतकूणकी येथे सोमवारी सायंकाळी प्रचंड गारपिट झाली. विश्वनाथ शिरतोडे यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेले. त्या पत्र्याच्या आड्याला बांधलेला पाळणा बाळासह उडाल्याने बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वस्तीवर काल वादळं आलं. ते इतकं जोरात होतं की घरात घुसलं आणि घराचं छतं उडून गेलं. त्यासोबत एक जीवही उडाला. तो जीव होता चार महिन्याचा गोंडस मुलीचा. ती त्या घरातील आड्याला बांधलेल्या पाळण्यात झोपली होती. वादळ घरात घुसतयं हे ध्यानात आल्यावर आई तिला पाळण्यातून काढायला पुढे सरसावलीच होती. पण तिच्या डोळ्यादेखत वादळानं सारं छत उचललं आणि पाळण्यासह बाळही उडून गेलं. काही मीटर अंतरावर जावून ते छत खाली कोसळलं आणि डोळ्यादेखत त्या निष्पाप लेकीचा बळी गेला.


विश्‍वास शिरतोडे नामक अल्पभूधारक शेतकरी वजा शेतमजुराच्या घरावर हे संकट कोसळलं. आधीच्या दोन लेकी आणि त्यावर आता तिसरी मुलगी झाली होती. कष्टानं या साऱ्या लेकींना मोठं करायचं, डगायचं नाही, हे ठरवून कुटुंब काम करत होतं. त्या लेकीची आई गरज पडली तर दुसऱ्याच्या शिवारात कामाला जात होती. 



चार महिन्याच्या लेकीला काल तिनं आढ्याला बांधलेल्या पाळण्यात ठेवलं आणि पाऊस यायच्या आत सारा पसारा आवरावा म्हणून ती कामाला लागली होती. पण, तिच्या लेकीच्या भाळी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. वादळानं तिचा वेध घेतला. वादळं इतकं जोरात होतं की साऱ्या कुटुंबाचा त्यानं विध्वंस करून टाकला. शिरतोडे कुटुंबाची लेक या वादळानं गिळली. अवघ्या चार महिन्याच्या पोरीचा पत्रे आणि अँगलच्या ओझ्याखाली दबून मृत्यू झाला.


जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आठवड्यापासून हजेरी लावत आहे. वादळी वाऱ्याने मुळे अनेक ठिकाणी घराचे पत्रे, छत उडून जात आहे. झाडे उन्मळून पडल्याच्या घटना आठवडाभरात घडल्या आहेत. तसेच मोठे डिजीटल फलक देखील उडून जात आहेत. तासगाव तालुक्‍यातही सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह मोठ्या गारा पडू लागल्या. 


त्यामुळे गावात सर्वांची पळापळ झाली. वादळी वाऱ्यामुळे मतकुणकी गावातील शेतकरी विश्‍वनाथ शिरतोडे यांच्या घराचे पत्रे हलू लागले. पत्राच्या आढ्याला चिमुकल्या सहा महिन्याच्या बाळाचा पाळणा टांगण्यात आला होता. अचानक जोरदार वाऱ्यामुळे भिंतीतून पत्रे उचकटले गेले. वाऱ्याबरोबर पत्रे आणि आढाला टांगलेला पाळणा देखील उडाला. अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडला.


आमदार सुमन पाटील, तहसिलदार कल्पना ढवळे, सभापती डॉ. शुभांगी पाटील, सरपंच नेताजी पाटील यांनी या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. त्या माऊलीचा हंबरडा काही थांबला नव्हता.