सांगली : कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील 'आटपाडी' तालुक्यात यंदाही भीषण दुष्काळ पडला आहे. तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. 24 गावे आणि 214 वाड्याना 33 टँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे. माणदेशी परिसरातील आटपाडी हा कायम दुष्काळी असणारा तालुका आहे. अत्यल्प पाऊस आणि अपुऱ्या सिंचन योजनांमुळे अजून ही आटपाडी दुष्काळग्रस्त आहे. पश्चिम भागात टेंभु सिंचन योजनेचे पाणी आल्याने तेथील गावांना थोडा दिलासा मिळाला पण पूर्व भागातील 24 गावे ही दुष्काळाचा सामना करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा आटपाडी तालुक्यात फक्त 30 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे तीव्र पाणी टँचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी लोकांची वणवण भटकंती सुरु असून, पाणी आणि  चाऱ्या अभावी जनावरांचे हाल होत आहेत. अनेक गावातील विहिरी आणि बोअर आटलेले आहे. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. शेळ्या-मेंढ्यांना पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे आटपाडी तालुक्यातील मेंढपाळांनी कृष्णा, वारणा नदीकाठाकडे स्थलांतर केले आहे. 


टँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र  या  ठिकाणी  अपुरा  पाणी  पुरवठा केला जातो. अशी तक्रार होत आहे. आटपाडी तालुक्यातील 24 गावे आणि 214 वाड्याना 33 टँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे आणि दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाखल झाली आहेत. या चारा छावणी मुळे दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तडवळे येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीत 392 मोठी आणि 80 लहान जनावरे अशी एकूण 472 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.  गजानन कामगार मजूर सहकारी सोसायटी लि. आटपाडी या संस्थेने ही चारा छावणी सुरू केली आहे. तर आवळाई येथे सिद्धनाथ महिला दुग्ध व्यावसायिक संस्था, आवळाई येथे दुसरी चारा छावणी सुरू करण्यात आली असून, या चारा छावणीत 131 मोठी आणि 43 लहान जनावरे अशी एकूण 174 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.


छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 15 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 6 किलोग्रॅम किंवा मुरघास 8 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य 1 किलोग्रॅम देण्यात येत आहे. 


छावणीत दाखल झालेल्या प्रति लहान जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 7.5 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 3 किलोग्रॅम किंवा मुरघास 4 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य अर्धा किलोग्रॅम देण्यात यावे. जनावरास चाऱ्याऐवजी ऊस द्यावयाचा झाल्यास तो अखंड न देता लहान तुकडे करून देण्यात यावा. यासाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 90 रूपये आणि लहान जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 45 रूपये अनुदान अनुज्ञेय असणार आहे.



वर्षांनुवर्ष दुष्काळ सोसत असलेल्या आटपाडी तालुक्यात कायम स्वरूपी दुष्काळ हटवण्याच्या उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा इथले दुष्काळग्रस्त व्यक्त करत आहेत.