सांगली : लग्नाला अवघे काही तासच शिल्लख असताना भर मांडवात नवरदेवावर काळाने घाला घातला. वयाच्या २७व्या वर्षी बोहल्यावर चढत असलेल्या रवींद्र मदन पिसे यांना हृदविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विवाहस्थळी शनिवारी घडली. या घटनेनंतर वर आणि वधूकडील दोन्ही कुटूंबांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, रवींद्र पिसे या मिरजेतील तरूणाचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील भूषण दिगंबर कुडाळकर यांची ज्येष्ठ कन्या वृषाली हिच्याशी होणार होता. ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी पार पडत होत्या. सर्व नातेवाईकांना निमंत्रणे पोहोचली होती. आलेल्या पाहूण्यांना हवे नको ते सर्व पाहिले जात होते. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता वधू-वरांचा हळदी समारंभ पार पाडला. हळदी समारंभ पार पडल्यावर वधूवरासह सर्वांना वेध लागले होते विवाह मुहूर्ताचे.


लग्नासाठी मिरजेतील टाकळी रसत्यावर असलेल्या शाही दरबार मंगल कार्यालयात दुपारी ११.४५ च्या मुहूर्तावर विवाह संपन्न होणार होता. या विवाहासाठी सकाळपासूनच वऱ्हाडी आणि पाहुणेमंडळींनी हजेरी लावली होती. अनेक पाहूणे येत होते. सर्वत्र धांदल सुरू होती. स्वत: नवरदेवही (रवींद्र) आपल्या मित्रांसह मुहूर्त गाठण्यासाठी विवाहाची तयारी करत होता. त्याची तयारी पूर्ण झाल्यावर सकाळी ८.३० वाजेदरम्यान, तो विवाहस्थळी पोहचण्यास निघाला. दरम्यान, रवींद्रच्या छातीत अचानक दुखू लागले. दुखण्याची तीव्रता वाढल्याने तो रस्त्यावरच कोसळला. मित्र आणि नातेवाईकांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.


दरम्यान, काही वेळातच ही बातमी विवाहस्थळी पोहोचली. घटनेची माहिती कळताच शाही दरबारमध्ये सुरू असलेले सनई चौघड्याचे सूर जागीच गोठले. सर्वत्र एक भयान शांतता पसरली. नातेवाईकही अवाक झाले. कोणीही कोणाशी काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. सर्वांनाच मानसिक धक्का बसला होता. आनंदाच्या क्षणांची जागा आक्रोश आणि दु:खाने घेतली.