सांगली : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याच्या बातम्या आपल्या कानावर, दृश्यरुपात डोळ्यांसमोर येत आहेत. पण, आज मात्र या पूरस्थितीची भीषणता दर्शवणारा एक फोटो सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू उभा करतोय. आज सांगली जिल्ह्यात बचावकार्य करणारी बोट बुडून एक भीषण दुर्घटना घडली. ब्रह्मनाळ पासून खटावकडे ही बोट निघाली होती. परंतु, इच्छित स्थळी पोहचण्याअगोदरच ही बोट पुराच्या पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलेत. यामध्ये ४ महिला, ३ पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या बोटीतील १५ जणांना वाचवण्यात यश आलंय. या बोटीत ३० जण होते. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहचली असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या दुर्घटनेचे काही फोटो समोर आलेत. हे फोटो या दुर्घटनेची आणि इथल्या पूरस्थितीची भीषणता दर्शवण्यासाठी पुरेशी आहेत. 


संवेदनशीलतेला आव्हान देणारं हे दृश्यं... (जबाबदारीचं पूर्ण भान राखत आम्ही हा फोटो जाहीर करत आहोत)

या फोटोमध्ये एक महिला आपल्या चिमुरड्यासोबत मृतावस्थेत दिसत आहे. बोट बुडाल्यानंतरही आईनं आपल्या चिमुरड्याला कुशीत घेऊन जीव वाचवण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. मृतावस्थेतही हा चिमुरडा आपल्या आईच्या कुशीत पहुडलेला दिसतोय. या दृश्यानं प्रत्येक संवेदनशील मनाला हादरवून टाकलंय.


बोटींची कमतरता... बचावकार्यात अडथळे


दरम्यान, सांगली शहराला पुराचा मोठा फटका बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मात्र बोटींची कमतरता असल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. सामाजिक संस्था आणि तरुण हे आपल्या जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्याचे आणि त्यांना खाद्यपदार्थ पुरवण्याचं काम करत आहेत. 


बचावकार्य सुरू 

सांगलीत आयुर्विन पूलाजवळ कृष्णा नदी ५७ फूटांवरुन वाहतेय. सांगलीतल्या अनेक उपनगरांमध्ये पाणी शिरलंय. बदाम चौक आणि नळभागमधल्या घरांमध्ये पहिल्यांदाच पुराचं पाणी शिरलंय.


राजकारण्यांचं राजकारण संपेना


एकीकडे ही भीषण परिस्थिती दिसत असताना दुसरीकडे राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांना मात्र याचं काहीही सोयरसूतक नसल्याचं समोर आलाय. तिकडे सांगली आणि कोल्हापूर पाण्यात असताना सुभाष देशमुख मात्र पुण्यातल्या भाजपाच्या निवडणुकीसंदर्भातल्या कार्यक्रमात मग्न होते. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शक्तीकेंद्रप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पूरग्रस्तांना भेट देण्याऐवजी त्यांनी या बैठकीला जाणं पसंत केलं.