सांगली: पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आणि धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आता सांगलीत महापूर ओसरू लागला आहे. एका तासामध्ये एक इंच इतकी पाणी पातळी कमी होत आहे. सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फूट ६ इंच इतकी आहे. सांगलीतल्या अनेक उपनगरांमध्ये अजूनही पाणी आहे, तर विस्तारित भागातील पाणी ओसरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर सांगलीतल्या मराठा समाज भवन, स्टँड रोड, जय मातृभूमी चौक, सिव्हिल ते एस टी स्टँड रोडे इथे तीन फूट पाणी होतं. पूर ओसरायला सुरुवात झाली असली तरी आता खरं आव्हान हे रोगराई थोपवण्याचं असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 


गुरांसाठी विशेष व्यवस्था


सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तालुक्यात पुराच्या पाण्यात असलेल्या शेतकऱ्यांना आपली जनावरं कशी सांभाळायची याची चिंता आहे. यासाठी वाळव्यातील एका लघु उद्योजकाने आपला कारखाना बंद ठेवून त्या शेडमध्ये जनावरांना आसरा दिलेला आहे. दुष्काळातील चारा छावणीप्रमाणे ही पुरग्रस्त चारा छावणी आहे, पण ती कोणत्याही शासकीय अनुदानशिवाय चालवली जात आहे. तर काही ठिकाणी गावातील शाळांमध्ये गुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. 


पुरामुळे शेतकऱ्यांचा घास हिरावला


पुरामुळे घरदार उद्ध्वस्त झालंच आहे, त्याचबरोबर अनेक जणांची १०० टक्के शेतीही पाण्याखाली गेली आहे. सातारा, सांगली, सोलापूर इथे सुरुवातीला पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने इथली पिके चांगली होती. मात्र पुरामुळे इथली नदीकाठची शेती पाण्याखाली गेलीच आहे. तर उर्वरित भागातील शेतांमध्येही पाणी साठल्याने ऊस, सोयाबीन, भात यासह इतर पिकं कुजायला लागली आहेत.