रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली महापालिका उद्यापासून पूर्णपणे शंभर टक्के लॉक करण्यात येणार आहे. कोरोनाचा सांगली जिल्ह्यात पहिला बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. सांगली शहरातील प्रमुख रस्ते वगळता सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहारही बंद करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच हॉटस्पॉट असलेल्या विजयनगर परिसरामध्ये ड्रोन कॅमेराद्वारे नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसंच कोणीही बाहेर पडूनये यासाठी या परिसरात पोलिसांचा २४ तास पाहारा राहाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांनी दिली आहे. 


सांगली शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून शहरातून विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही बाहेर फिरु नये असं आवाहन सोहेल शर्मा यांनी केलं आहे.


दरम्यान, सोमवारी सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या विजयनगर येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १७ एप्रिल पासून त्या रुग्णावर मिरजच्या कोविड विशेष रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.


त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ६ जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केलं आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील एक डॉक्टर आणि इतर २६ अशा एकूण २७ जणांना इनस्टिट्यूट कोरोन्टाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. संपर्कातील अन्य व्यक्तीचा शोध सुरु आहे.


सांगली जिल्ह्यात यापूर्वी इस्लामपूरमधील २६ कोरोना रुग्ण आढळले होते, त्यापैकी २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर एका महिलेचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे.