सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातल्या कलाकार मानधन समितीमध्ये बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्याने मंत्र्यांविरोधातच आंदोलन सुरु केलं आहे. भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्याच पालकमंत्र्यांवर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे सांगलीतल्या या आंदोलनाची चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या बोगस नियुक्त्या केल्याचा आरोप करत भाजपा अनुसूचित जाती जमातीकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाजंत्री घेऊन आटपाडी तालुका अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष दुर्योधन जावीर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांकडून आंदोलन करण्यात येत आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून केवळ सांगली आणि मिरज शहरातील मर्जीतील व्यक्तींची कलाकार मानधन समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्या, त्याचबरोबर होलार समाजाबाबत जात प्रमाणपत्रामध्ये असणारी पुराव्याची जाचक अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.


होलार जात प्रमाणपत्र काढण्यासाठी 1950 पूर्वीचे पुरावे सादर करण्याची अट आहे मात्र होणार समाजात सध्या 1950 पूर्वीचे कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत किंवा त्यांच्या नावे जमीन देखील नाही. त्यामुळे अशी पुरावे सादर करण्यात मोठी अडचण येत आहे. होलार समाज मुख्यता कलाकार म्हणूनच पारंपारिक पद्धतीने आजही गावगाड्यात काम करतोय. त्यामुळे जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी असणारी पुरावे सादर करण्याची अट रद्द करण्यात यावी,व अन्य पर्याय काढावा ,अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.


तसेच जिल्ह्यातील अनेक कलाकरांचे गेल्या 6 महिन्यापासून मानधन थकले आहे,समिती स्थापन नसल्याने हे मानधन थकीत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर 17 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कलाकार मानधन समिती स्थापन झाली. मात्र ही समिती पालकमंत्र्यांच्या कडून बरखास्त करून पुन्हा 17 ऑक्टोबर 2023 रोजी पुन्हा दुसरी समिती स्थापन करण्यात आली. ज्यामध्ये सांगली आणि मिरज मधील त्यांच्या मर्जीतील व्यक्तींचा समितीमध्ये समावेश करण्यात आल्याचा आरोप भाजपा अनुसूचित जाती जमातीचे आटपाडी तालुका अध्यक्ष दुर्योधन जावीर यांनी केला आहे.


"मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जी समिती निवडली ती पूर्णपणे बोगस आहे. त्यामध्ये फक्त सांगली, मिरज या भागातील सदस्यांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. या कलाकारांविरोधात केलेल्या अन्यायाविरोधात आंदोलनाला बसलो आहे. तसेच अनुसुचित जातीमधील 1950 चा पुरावा रद्द व्हावा. त्यामुळे आता लहान मुलांचा जातीचा दाखला काढण्यासाठी वडिलांचा दाखला आवश्यक असतो. पण वडिलांचाच दाखला नसेल तर मुलांचा काढता येत नाही. त्यामुळे 1950 चा पुरावा रद्द व्हावा यासाठी उपोषणाला बसलो आहोत. जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री याचे उत्तर देत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाही. होलार समाज हा जन्मताच कलाकार आहे. कुणाची वरात कशी काढायची हे आमच्या रक्तात आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तुमचे कपडेही राहणार नाहीत," असा इशारा भाजप अनुसूचित जाती-जमात तालुकाध्यक्ष दुर्योधन जावीर यांनी दिला.