शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची भाजपला जि. प. निवडणुकीत मदत
सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजपला मदत केल्याने भाजपची सत्ता अबाधित राहिली आहे.
सांगली : येथील जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजपला मदत केल्याने भाजपची सत्ता अबाधित राहिली आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी भाजपला मदत केल्याने शिवसेनेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता कोरे तर उपाध्यक्षपदी शिवाजी तथा पप्पू डोंगरे यांची निवड करण्यात आली. अत्यंत चुरस निर्माण झालेल्या निवडणुकीत भाजपने आपला गड अबाधीत राखला तो शिवसेनेच्या मदतीने. त्यामुळे सांगलीतील युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
विटा खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज असल्याचे बोलले जात आहे. ते दोन दिवसात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपला मतदारसंघ विटयात शनिवारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेत भाजपशी युती असल्याने आणि ते आमचे नैसर्गिक मित्र आहेत. त्यामुळे आम्ही भाजपला पाठींबा दिला, असा खुलासा आमदार अनिल बाबर यांनी केला आहे.
गेल्या अडीच वर्षात सांगली जिल्हा परिषदेत भाजपशी युती असल्याने आणि ते आमचे नैसर्गिक मित्र असल्याने आम्ही त्यांना पाठींबा दिला. सत्तेसाठी जिल्हा परिषदेत युती केलेली नाही. पक्षाचा आदेशच नाही आणि भाजपशी जिल्हा परिषदेत युती असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचा गौप्यस्फोट अनिल बाबर यांनी केला.
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. सोशल मीडियातून अनेक कार्यकर्ते त्यांची मते व्यक्त करत आहेत. अशावेळी त्यांच्याशी हितगुज करणे आणि आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी खानापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा शनिवारी विटयात चार जानेवारी रोजी पंचफुला मंगल कार्यालयात मेळावा आयोजित केल्याची माहिती त्यांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.