पुणे: भाजप पुरस्कृत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी रविवारी आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या तोडांवर त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: पुण्यातील राजकारणाला वेगळीच रंगत येणार आहे. संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्याची बदललेली परिस्थिती पाहता मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रवेशानंतर राहुल गांधी जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. गेल्या दोन दिवसांमध्ये मी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मी त्यांच्याकडे काँग्रेसमध्ये काम करायची इच्छा व्यक्त केली. त्यांच्याकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करेन, असे काकडे यांनी सांगितले. मात्र, मी कुठल्याही पक्षात गेलो तरी माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री ही कायम राहील, असेही काकडे यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी संजय काकडे अजित पवारांच्या भेटीला


संजय काकडे पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी विविध पर्याय शोधायला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानतो, आणि भावाने लाथ मारली तर दुसरीकडे आसरा शोधावाच लागेल, असेही त्यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचीही भेट घेतली होती. कागदावर मतांची आकडेवारी आणि व्यवस्थापन करण्यात संजय काकडे माहीर समजले जातात. त्यामुळे काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुण्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.