लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी संजय काकडे अजित पवारांच्या भेटीला

पुण्याची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास समीकरणे बदलण्याची शक्यता

Updated: Feb 11, 2019, 08:27 PM IST
लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी संजय काकडे अजित पवारांच्या भेटीला title=

पुणे: भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे यांनी सोमवारी दुपारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी संजय काकडे बऱ्याच काळापासून देव पाण्यात बुडवून बसले आहेत. मात्र, भाजपकडून नकारार्थी संकेत मिळाल्यानंतर संजय काकडे यांनी विविध पक्षांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात त्यांनी आज दुपारी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपने आपला वापर केल्याचा आरोप केला. मुख्य़मंत्री आपल्या भावासारखे आहेत. मात्र भावाने लाथ मारल्यामुळे आसरा शोधावा लागतोय, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. 

मात्र, अजित पवारांच्या भेटीतही काकडे यांच्या पदरी निराशाच पडली. तर पुण्याची जागा काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे अजित पवारांनी काकडे यांना सांगितले. गेल्या महिन्यात रावसाहेब दानवे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाच्या घेतलेल्या आढावा बैठकीसाठी काकडेंना निमंत्रण देण्यात आले नव्हते. यानंतर अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या बैठकीतही काकडे दिसले नव्हते. त्यामुळे काकडे यांनी काळाची पावले ओळखत पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी विविध नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी शरद पवार, अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. 

राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसला दक्षिण अहमदनगरची जागा हवी आहे. आघाडीने तिकिट दिले तर ठीक नाही तर आपण अपक्ष निवडणूक लढवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे वेळ पडल्यास पुण्याच्या बदल्यात राष्ट्रवादी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडू शकते. या पार्श्वभूमीवर संजय काकडे व अजित पवारांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.