`गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...`; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले `फडणवीसांच्या जागी...`
Sanjay Raut: एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचे सरकार आधांतरी लटकून पडला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut: राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत कलह सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मुख्यमंत्री व जागावाटपाचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न सध्या उपस्थित होते. आहे. गृहमंत्रीपदावरुन शिंदे आणि भाजपमध्ये वाटाघाटी सुरू असल्याचं बोललं जातंय. मात्र, या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. 'एक गृहमंत्रीपद वादाचा विषय असू शकत नाही', त्याला वेगळी कारणे आहेत का? असं राऊतांनी म्हटलं आहे.
'एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचा सरकार आधांतरी लटकून पडला आहे. हे कसलं मजबूत सरकार? तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तुमच्या सोबत अजित पवार आहेत शिंदे गटाचे लोक तुमच्या सोबत आहेत नाहीत माहित नाही. भविष्यात ते काय करतील माहित नाही. राजभवनात तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. राज्यपालांकडून अजून तुम्ही सत्ता स्थापनेचा निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही आधीच मांडव घातला? राजभवन तुम्ही चालवत आहात का,' असा सवाल राऊतांनी केली आहे.
'हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही. हे जे मागण्या करतायेत ना भाजपने ठरवलं तर एका मिनिटात चिरडून टाकतील. समोरची लोक घाबरट आहेत. फक्त गृहमंत्री पद सरकार स्थापनेमधला विषय असू शकत नाही. फडणवीसांच्या जागी वेगळे कोणी आणलं जातंय का? त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का? उद्यापर्यंत या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही आमचं पुस्तक उघडू,' असा इशारा राऊतांनी दिला आहे.
150 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा लोकसंख्या वाढवा, राऊतांचा भागवतांवर निशाणा
'मोहन भागवत यांना देशाच्या लोकसंख्येबद्दल खूप चिंता होत आहे. 150 करोड लोकसंख्या झाली आहे अजून किती लोकसंख्या मोहन भागवत वाढवणार आहेत. तुमचं सरकार कॉमन सिविल कोड आणायचा ठरवत आहे. कुटुंब कल्याण कुटुंब नियोजन ची योजना चालवत आहे आणि भाजपची पेरेंट बॉडी आरएसएस सांगते मुलं वाढवा,' असं राऊतांनी म्हटलं आहे.
'आपल्याकडे रोजगार आहे का आपली सरकार नोकरी देत आहे का? शिक्षण फ्री आहे का? महिलांची सुरक्षा होत आहे का? यावर सरसंघचालक का बोलत नाहीत ? विविध देशात हिंदू संकटात आहे. जगभरातील हिंदूंची रक्षा मोदी करत नाहीयेत. मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांना बोलवावं. त्यांची पाठशाला घ्या,' असा टोला त्यांनी लगावला आहे.