पोपटांनतर आता अजगर, मगर; संजय राऊत म्हणतात `भाजप` सोबत आलेल्यांना खाऊन टाकतो
राज्याच्या राजकारणात पोपटाची एंट्री झाली आणि राज्याच्या राजकारणात किलबिलाट सुरु झाला. राज्यातील नेते एकमेकांवर पोपटावरुन टीका केली. त्यातच आता अजगर आणि मगर या नव्या प्राण्यांची भर पडली आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पोपटावरुन कलगीतुरा रंगला होता. आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजगर आणि मगर यांची एंट्री झाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपची तुलना अजगर आणि मगर या सोबत केली आहे. अजगर, मगर असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवर भाजप नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी देखील पलटवार केला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
भाजप शिंदे गटाला लाथा घालत आहे, भाजप म्हणजे अजगर, मगर आहे. सोबत आलेल्यांना भाजप पक्ष खाऊन टाकतो अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजप लाथा घालतंय हे कीर्तीकरांनी मान्य केलंय असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. त्यांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी पलटवार केला आहे.
भाजप नेत्यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील असा पलटवार भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. तर, संजय राऊतांना लोकंच जागा दाखवतील अशी प्रतिक्रिया, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. राऊतांनी खोका या विषयावर चित्रपट काढण्याची घोषणा केली होती, त्यावर खासदार शिंदेंनी हे प्रत्युत्तर दिले.
पोपटावरुन महाविकास आघाडी भाजपमध्ये जुंपली
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली. याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गटात वार प्रहार पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचा पोपट मेलाय असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला.फडणवीस जर असं विधान करत असतील तर शहाणपणाची व्याख्या बदलावी लागेल असा टोला राऊतांनी लगावला होता. तर जेलवारी होणार असल्यानं मविआच्या पोपटाची भाषा मावळली अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली होती. मविआ-भाजपत पोपटावरुन सामना सुरु असताना पोपट मेलाय की नाही हे तुम्ही झूमध्ये जाऊन पाहा अशी मिश्किल प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली होती.
पोपट, मैना, मोर कुणीही मेलेले नाही - अजित पवार
पोपट मेला नाही, मैना मेली नाही, मोर मेला नाही. सगळे जिवंत आहे. कोण कुठं मेलय दाखवा असं म्हणत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगवला आहे.