योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शिवसेनेतील बंडखोरी शमवण्यासाठी आलेले खासदार संजय राऊत यांनी अचानक भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या बाळासाहेब सानप यांची भेट घेतली. यामुळे शहरात आता वेगळीच चर्चा रंगली आहे. हे दृष्यं नाशिकमधलं. पूर्वाश्रमीचे भाजपा नेते बाळासाहेब सानप आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणे पंचवटी परिसरातल्या त्यांच्या घरावरून निघाले होते आणि सहजच त्यांच्या घरी गेले... सानपांनी त्यांचं स्वागतही केलं आणि राऊतांनी सानपांच्या कार्यकर्त्यांशी चर्चाही केली... सगळं अगदी सहजच घडलं आहे.


शिवसेनेला जागा गेल्यानं नाराज झालेल्या सानपांचा सामना आहे. तो युतीचे अधिकृत उमेदवार राहुल ढिकले यांच्याशी... 'माझं काय चुकलं' असं म्हणत सानपांचा प्रचार सुरू आहे. यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालं आहे. ग्रामीण भागातील वंजारी समाजाचे मतदार दूर जाऊ नयेत, म्हणून संजय राऊत यांनी ही सहज भेट दिल्याचं आता बोललं जात आहे. 


दुसरीकडे पश्‍चिम नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या विलास शिंदेंनी आमदार सीमा हिरेंना आव्हान दिलं आहे. ही बंडाळी शमवण्यासाठी संजय राऊतांनी बैठक घेतली खरी, मात्र त्यांना हिरेंविरोधात तक्रारीच ऐकाव्या लागल्या. 


अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांविरोधात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे राऊतांनी केलेला बंड शमवण्याचा हा प्रयत्न लुटुपुटूचा नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.