मुंबई : देशात मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष सुरू असल्याने देश पुन्हा तुटेल अशी भीती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये त्यांचा सत्कार झाल्यानंतर मुलाखती दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग, पवार ईडी नोटीस अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार स्थापन करताना भाजपचाच कॉन्फिडन्स गेला होता. - आमचं टॅपिंग ऐकून त्यांचा कॉन्फिडन्स गेल्याचे ते म्हणाले. माझा फोन टॅप केला असेल तर मी किती उत्तम शिव्या देतो ते त्यांना समजेल असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच मी सांगितलेला आकडा विश्वास दर्शक ठरावावेळी लोकांना दिसलाच असेही ते म्हणाले. काही फिस्कटणार नाही याची मला खात्री होती. जे माझ्यावर अंगावर येतात ते माझं काहीच वाकड करू शकत नाही कारण मी फाटका माणूस असल्याचेही ते म्हणाले. 



शरद पवार यांचासारख्या नेत्याला नोटीस येते. त्यामुळे हे बदलायला पाहिजे असं मी शरद पवार यांना पहिल्यांदा म्हटलं होतं. ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांचा बाजूने बोलणारे कमी होते त्यातला मी एक होतो असे राऊत म्हणाले. 
आम्हाला विरोधात बसण्याचा निकाल आहे असं पवार साहेब बोलत होते हे खरं असले तरी लोकशाही मध्ये अस बोलावं लागत आणि ती शरद पवार यांचा काम करण्याची पध्दत असल्याचे सांगत सरकार स्थापन होऊ शकते याबाबत माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास शरद पवारांना होता असा किस्सा देखील त्यांनी सांगितला. मी लिलावतीत ऍडमिट झालो ते आमचं ठरल्याप्रमाणे असल्याचे ते म्हणाले. 


काँग्रेसला तर सत्तेत येऊ असं स्वप्नही पडलं नसेल. गांधी घराण्याच्या त्यागाच्या आसपास आज एकही कुटुंब जाऊ शकत नाही. या कुटुंबावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणं शोभत नाही. नरेंद्र मोदी हे टोलेजंग नेते आहेत पण काँग्रेस पक्ष म्हणजेच स्वातंत्र्याची चळवळ असल्याचे राऊत म्हणाले.