`महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय`; राज्यपालांच्या विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं
Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नवा वाद पेटलाय. औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj) तो पुरानी बात हे, असे म्हटलं होतं. या विधानावरुन सत्ताधारी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावरुन भाजपला लक्ष्य केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर टीका केलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुखावला गेला आहे. त्याचवेळी भाजपाच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं विधान केले आहे. हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी माफी मागितली हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाहिजे कारण ते भाजपचे सहयोगी आहेत. सावरकरांच्या बाबत रस्त्यावर उतरुन जोडे मारलेत. आता जोडे कोणाला मारणार आहात? भाजप प्रवक्यांना की राज्यपालांना? छत्रपतींनी माफी मागितली तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन त्यांचा जयजयकार का करतात? अफजलखानाच्या कबरी तोडण्याची नाटकं कशाला करताय? शिवाजी महाराजांचा अपमान करुन 72 तास झाले आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान आता कुठे गेला?" असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. भाजपने आणि त्यांच्या राज्यपालांनी अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलंय. तरीही तुम्ही सत्तेला चिकटून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय," असे संजय राऊत म्हणाले.
राज्यपाल काय म्हणाले?
"आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला तुमचा फेव्हरेट हिरो कोण असे विचारायचे तेव्हा कुणाला सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरु चांगले वाटायचे. पण मला असं वाटतंय की जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचा आदर्श कोण तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळून जातील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. नव्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉक्टर नितीन गडकरी पर्यंत इथेच आदर्श मिळतील," असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.