`अमित शाह फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिक प्रेमात पण हे अफेअर...`; राऊतांचा इशारा
Amit Shah In Love With CM Shinde: केंद्रीय नेतृत्वामधील भाजपाचे दोन सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
Amit Shah In Love With CM Shinde: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या कथित वादावर भाष्य करताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला. अमित शाह हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रेमात पडलेले दिसतात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
मराठी माणसाला कमजोर करण्यासाठीच...
अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. "माहिती समोर आली आहे. खरं म्हणजे तुम्ही बैठकीमध्ये लाईव्ह कॅमेरे बसवले पाहिजेत. त्यामुळे यापेक्षा भयानक माहिती समोर येईल. कोणाचाही पायपूस कोणाच्याही गळ्यात किंवा पायात नाही अशी सरकारची परिस्थिती आहे. या सरकारमधील तीन पक्ष पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. अमित शाहांना फक्त महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. मराठी माणसाला कमजोर करायचं आहे. त्या उद्देशानेच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडली. त्या एका उद्देशाने त्यांनी सरकार स्थापन केलं. असं सरकार एक दिलाने, एकजीवाने कसं काम करेल?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
हरियाणातील निवडणुकीचा खर्च महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला; राऊतांचा दावा
पुढे बोलताना राऊत यांनी, "बरं हे सगळे खा खा खाणारे लोक आहेत. पुजा करतात देवीची वगैरे, पण इतकं खादाड सरकार आम्ही पाहिलेलं नाही. 40 टक्के कमिशन खातात. मिस्टर 40 पर्सेंट आहेत इथे सगळे. मुख्यमंत्री 40 पर्सेंट, अजित पवार 40 पर्सेंट, देवेंद्र फडणवीस 50 पर्सेंट, राज्याला काय मिळतंय? या कमिशनबाजीमुळे यांचं आपआपसात पटत नाही. प्रत्येकाला निवडणुकीमध्ये वारेमाप पैसा हवा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी अशी आहे की त्यांना इतर राज्यांचाही खर्च करायचा आहे निवडणुकींचा! हरियाणाचा खर्च इथल्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. किती हजार कोटी असेल विचार करा. कुठून आले पैसे? यापुढे इतर राज्यातील निवडणुकांचा खर्च देखील मुख्यमंत्र्यांवर टाकण्यात आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात लूटच लूट," असंही म्हटलं.
नक्की वाचा >> मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-अजित पवारांमध्ये बाचाबाची? CM इशारा देत म्हणाले, 'तुम्ही सही केली नाही तर...'
सध्या मुख्यमंत्र्यांनी तो विक्रम मोडला
"तीन पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या हाणामाऱ्या सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसचे एस. के. पाटील नेते होते. त्यांची ख्याती अशी होती की ते मुंबईतून दिल्लीला सगळ्यात जास्त पैसे द्यायचे. त्या सगळ्यांचा रेकॉर्ड सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोडला सध्या असं दिसतंय मला. त्यामुळे अमित शाह हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिक प्रेमात पडलेले दिसतात. पण हे प्रेम नसून अफेअर आहे लक्षात घ्या! ते कधीही तुटू शकतं," असं संजय राऊत म्हणाले.