`देवेंद्रजी, ही माणसं कोण? गुंडांचे इतके..`; शिंदे पिता-पुत्राचे `ते` फोटो शेअर करत राऊतांचा सवाल
Law And Order Situation in State Of Maharashtra: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावरुन उद्धव ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी काही फोटो पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.
Law And Order Situation in State Of Maharashtra: मुख्यमंत्र्यांना 'वर्षा'वर गुंडांच्या टोळ्या येऊन भेटतात, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयामध्ये गुंडांच्या टोळ्यांच्या मोहरक्यांबरोबर बैठका होतात असा निशाणा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून साधला आहे. यावेळेस बोलताना त्यांनी एक्स (ट्वीटरवरुन) शेअर केलेल्या फोटोचा संदर्भही दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा गुंडांची रांग
मुंबईचा एक माजी पोलीस अधिकारी या सर्व बैठकांसाठी मध्यस्थी करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्याआधी विरोधकांना संपवण्याचं षड्यंत्र रचलं जात असल्यचा दावाही राऊत यांनी केला. "राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 'वर्षा' बंगल्यावर, शासकीय निवासस्थानी तसेच मंत्रालयामध्ये येऊन गुंड टोळ्या भेटत आहेत. खून, दरोडे, बलात्कार यासंदर्भात जामीनावर सुटलेले किंवा खास जामीनावर बाहेर काढलेल्या या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करत आहेत?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. "हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अजित पवारांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा गुंडांची रांग लागलेली आहे," असा टोला राऊत यांनी लगावला.
विरोधकांना संपवण्याचं षड्यंत्र
"गेल्या महिनाभरामध्ये 'वर्षा' बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहे असं सांगितलं जात आहे ना त्या त्यांच्या गुंड टोळ्यांच्या मोहऱ्यांबरोबर बैठका होत आहे. मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणत आहे. आम्ही लवकरच त्याचा पर्दाफाश करणार आहोत. फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना संपवण्याचं षड्यंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे," असं संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना प्रश्न
संजय राऊत यांनी काल तसेच आजही काही फोटो आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. कालच्या फोटोंमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंच्या वाढदिसवाचा फोटो असून त्यामध्ये त्यांचा सत्कार करणारी व्यक्ती कोण आहे असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. "माननीय गृहमंत्री देवेंद्रजी, जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत," अशी कॅप्शन या फोटोला राऊत यांनी दिली आहे.
शिंदेंबरोबरची ती व्यक्ती कोण?
आज पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री शिंदेंबरोबर आमदार संजय बांगर यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली व्यक्ती ही पुण्यातील गुंड निलेश घायवळ असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. "महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे," असा टोला एक्सवरुन राऊत यांनी लगावला आहे.
काँग्रेसकडूनही टीका
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही गुंडगिरीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा तसेच संत-महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. मात्र मागील 2 वर्षांपासून घोटाळेबाजांचा आणि गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची ओळख करण्यात शिंदे सरकारने प्रगती केली आहे असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.