मुख्यमंत्र्यांवर कोणाचाही दबाव नाही- संजय राऊत
संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य
मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे स्वकीयांकडूनही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर संजय राठोड अधिवेशनाआधी राजानामा देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं असून त्याद्वारे संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असं ट्विट केलं आहे.
शिवसेना खासदार राऊत यांनी 'सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन' असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला. त्यामुळे या ट्विटवरून संजय राऊत यांनी संजय राठोड यांना एक प्रकारे सूचक इशारा दिला जात असल्याची चर्चा आहे.
चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या, पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक
औरंगाबाद इथे बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचाही दबाव नाही असं देखील सांगितलं आहे. कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेतील. मुख्यमंत्री हे राजधर्म पाळतात आणि ते राजधर्म पाळतील असा विश्वास असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.