चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या, पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Updated: Feb 27, 2021, 07:22 PM IST
चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या, पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक  title=

मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर (Chitra Wagh Husband Kishor Wagh ) एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून स्वतः चित्रा वाघ यांनी पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर भाजपनंही या प्रकारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. (Chitra Wagh's Attacks on Maha Vikas Aaghadi Govt.)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना धारेवर धरणाऱ्या भाजपच्या फायब्रँड लीडर चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी ACBनं 15 दिवसांपूर्वी ही कारवाई केलीये. मात्र ही बातमी आपल्याला पत्रकारांकडूनच समजली. सरकारनं एक कागदाचा चिटोराही पाठवला नसल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.

खरंतर हे प्रकरण आहे 5 जुलै 2016चं. किशोर वाघ परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत होते. एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक झाली. त्यानंतर निलंबनही झालं. 

मात्र आता पोलिसांनी हे प्रकरण ऐरणीवर आणलंय. शिवसेनेवर सातत्यानं हल्ला चढवत असल्यामुळे सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. या आरोपावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मौन बाळगणंच पसंत केले आहे.

संजय राठोड आणि शिवसेनेवर सातत्यानं टीकेची झोड उठवणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधातील जुनं प्रकरण नेमकं आताच बाहेर काढण्याचं कारण काय, याचं उत्तर विरोधी पक्ष मागत आहे. खरं काय, हे लवकर बाहेर यावं ही अपेक्षा.