मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा महत्वाचा वाटा राहीला. त्यांनी रोज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आणि सत्तेची समीकरणं बदलालयला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजुने त्यांचे ट्विटर वॉर देखील सुरु होते. आपल्या प्रत्येक ट्विटमधून ते भाजप सरकारला सूचक इशारा देत होते. शिवसेना सत्तेत आली तरी संजय राऊतांचे ट्वीट वॉर सुरु आहे. आजही त्यांनी एक ट्वीट करुन विरोधकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या ट्वीटवर सत्ताधारी, विरोधक, राजकीय विश्लेषक अशा सर्वांचेच लक्ष असते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अंजाम से पहले खुद मेरी कहानी सुनाएगा कोई और !' असे ट्वीट राऊत यांनी केले आहे. त्यामुळे या ट्वीटचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. हे ट्विट म्हणजे विरोधकांसाठी इशारा आहे का ? की शिवसेनेची रणनीती आहे ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 


हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. शरद पवारांवर टीका करणाऱ्या सामनाचा उल्लेख त्यांनी अधिवेशनात केला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'सामना'चे मुख्य संपादक होते. त्यामुळे त्याची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर पलटवार केला. आम्ही पंतप्रधान मोदींबद्दलही छापले होते हे तुम्ही दुर्लक्षित केले. स्वत:च्या सोयीनुसार सामना वाचत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर केली. आता 'सामना'ची संपूर्ण जबाबदारी राऊतांकडे आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि 'सामना' यातून विरोधकांचे डावपेच हाणून पाडण्याचा प्रयत्न झालेला पाहायला मिळणार आहे. 



पवारांची मुलाखत 


गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सत्ताकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २९ तारखेला पुण्यातील एका कार्यक्रमात संजय राऊत शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे राऊतांच्या रोखठोक प्रश्नांवर शरद पवार काय बोलणार, याची उत्सुकता आतापासूनच लोकांना लागली आहे. यावेळी शरद पवार महाविकासआघाडीच्या आगामी वाटचालीसंदर्भात काय भाष्य करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते सध्या नागपूरमध्येच आहेत. हिवाळी अधिवेशनात महाविकासआघाडीची मदत करण्यासाठी हे दोघे नागपूरात ठाण मांडून असल्याची चर्चा आहे.