Sanjay Raut's close associate arrested : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे टेन्शन वाढणवारी बातमी समोर आली आहे.  संजय राऊत यांचे जवळचे सहकारी बाळा कदम यांना अटक करण्यात आली. 100 कोटींच्या कथित कोविड सेंटर (Covid center scam) घोटाळा प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांचा कथित लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस कंपनीचा, शंभर कोटींचा कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. कदम यांच्यासह राजीव साळुंखे या आणखी एकालाही अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.


काय आहे हा कोविड सेंटर घोटाळा?


साधारण वर्षभरापूर्वीच म्हणेजच फेब्रुवारी 2022 मध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. संजय राऊत आणि त्यांच्या मित्रपरिवाराने 100 कोटी रुपयांचा जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. राऊत यांच्याशी संबंधीत असलेले भागिदार सुजीत पाटकर यांची बनावट, कागदी कंपनी असल्याचा दावा करत किरीट सोमय्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे केली होती. 


तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही केले होते गंभीर आरोप


या कथित घोटाळ्यात सोमय्या यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकरांची लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसेस ही बनावट कागदी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून दहिसर, वरळी एनएससीएल, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड कोविड सेंटरचे कंत्राट घेण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मंजुरी दिली होती असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिका, पुणे विकास व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि इतर अशा संस्थांनी कोविड केंद्रे चालवण्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचारी/सेवा पुरवण्यासाठी विविध कंपन्यांना कंत्राट दिले होते. यासाठी बनावट करारनामे बनवल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.