Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंनाच घरचा आहेर दिलाय. सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलंय. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत  धनंजय मुंडेंच्या राजीनामा घेण्याची मागणी प्रकाश सोळंकेनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे केलीय. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा पार पडला यावेळी प्रकाश सोळंकेंनी आक्रमक भूमिका घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे सर्व अधिकार वापरून  घटनाबाह्य सत्ताकेंद्र चालवत असल्याचा गंभीर आरोपही सोळंकेंनी केलाय. सत्तेचा गैरवापर करून अनेकांना खोट्या गुन्ह्यात  अडकवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.. आता सरकार काय भूमिका घेणार आणि यातून कसा मार्ग काढणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.


सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय एल्गार पुकारण्यात आलाय. सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी तर थेट नाव घेऊन आक्रमक हल्लाबोल केलाय. सरपंच हत्या प्रकरणातील म्होरक्याचा सूत्रधार धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन बोलतो, असं म्हणत संभाजीराजेंनी मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. इतकंच नाही तर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करू नका, अन्यथा छत्रपती घराण्याला बीडचं पालकत्व स्वीकारावं लागेल, असा थेट इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी राज्य सरकारला दिलाय.


मनोज जरांगे पाटलांनीही तर थेट मंत्र्यांच्या अटकेची मागणी केली आहे. मंत्र्यांना अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते. राज्यपाल तुमचेच आहेत, परवानगी घ्या आणि लगेच उचला अशी आक्रमक मागणी जरांगे पाटलांनी केली आहे.
बीडमधल्या मोर्चाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर सातत्यानं करत आहेत. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचा थेट आरोप क्षीरसागर यांनी केलाय.
विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही याप्रकरणावरून कारवाईची मागणी केली आहे. भाजप आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेऊन कारवाईची मागणी करत आहेत. बीडमध्ये अॅडॉल्फ हिटलर तयार झाला की काय, असा सवाल करून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.


विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून सत्ताधारी पक्षाचे नेतेही बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी झाले होते. तपास होत नाही तोवर अजितदादांनी धनंजय मुंडेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी नरेंद्र पाटलांनी केलीय. तर वाल्मिक कराड असो किंवा इतर कुणी त्यांना अटक करा, अशी आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.


मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेलाय. वाल्मिक कराड यांच्या जवळीकीवरून धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. आता थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.