नाशिकचा पेशवेकालीन `सरकारवाडा` पुन्हा `जिवंत` होतोय!
मराठा इतिहास आणि समृद्ध पर्यावरण या दोघांचीही साक्ष म्हणजे जुने लाकडी वाडे... राज्यात आता असे वाडे फार कमी शिल्लक राहिले आहेत. पेशवाईचा हा खजिना चित्रपटात पाहायला मिळतो. पुण्यातील सर्वात मोठा शनिवार वाडा इंग्रजांनी जाळला. मात्र इतर ठिकाणी असे काही वाडे अजून शिल्लक आहेत. नाशिकमधल्या पेशवेकालीन वारशाची आठवण करून देणारा हा वाडा...
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मराठा इतिहास आणि समृद्ध पर्यावरण या दोघांचीही साक्ष म्हणजे जुने लाकडी वाडे... राज्यात आता असे वाडे फार कमी शिल्लक राहिले आहेत. पेशवाईचा हा खजिना चित्रपटात पाहायला मिळतो. पुण्यातील सर्वात मोठा शनिवार वाडा इंग्रजांनी जाळला. मात्र इतर ठिकाणी असे काही वाडे अजून शिल्लक आहेत. नाशिकमधल्या पेशवेकालीन वारशाची आठवण करून देणारा हा वाडा...
सरकारवाडा (चोपडावाडा)
१८१८ मध्ये पेशवाई खालसा झाली आणि इंग्रजांनी भारतभर आपलं साम्राज्य पसरलं. या पेशवाईची एक खूण नाशिकमध्ये अजूनही उभी आहे. पेशवेकालीन सरकारवाडा पूर्णपणे ढासळला होता. मात्र, पुरातत्व विभागाने तो पुन्हा उभारला. या वाड्याची भिंत अतिशय गुळगुळीत अशा दगडातून बनवलेली आहे. त्यामुळे त्याला चोपडावाडा असंही म्हणतात. याच वाड्याला पुलावरचा वाडा असंही काही जण म्हणतात.
ऐतिहासिक वाड्याला वाळवी
मात्र सराफा बाजारातल्या या ऐतिहासिक ठेव्याला वाळवी लागली होती. अतिशय जीर्ण अवस्थेत सरकारवाडा होता. अखेर कोट्यवधी रूपये खर्चून पुन्हा याचं जतन केलं जातंय. लाकडी कोरीव काम, पूर्व पश्चिमेच्या उन्हाचा खेळ यांना पुन्हा पुनरूज्जीवन मिळतंय. दरबारी हॉलला नवा साज चढलाय. वाडा, त्यातला कारंजा, जुन्या काळातील कड्या, जिने बघणं केवळ अवर्णनीय आहे.
अतिक्रमणाचं कोंदण
संपूर्ण साग त्यातली सुबकता आजही आहे तशीच रेखाटण्याचा प्रयत्न केला जातोय. पुरातत्व विभाग त्यासाठी पाच वर्षांपासून झटतोय. जमिनीवरची वास्तू तयार झालीय. पण दुसऱ्या मजल्याचं काम अजून सुरूच आहे. याबाजूची अतिक्रमणं काढून वाड्याला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी महापालिकेने तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे. नाही तर वाड्याच्या सौंदर्याला अतिक्रमणांचं कोंदण हिणकस ठरेल...