साताऱ्यात पाळीव गाढवाचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याचा तोडला लचका
Satara Crime : साताऱ्यात घडलेल्या या विचित्र घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. गाढवाने घेतलेल्या चाव्यामुळे चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : आतापर्यंत आपण कुत्र्याने चावा घेतल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा चिमुकल्यांना जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र कधी गाढवाने (Donckey attack) कोणाचा चावा घेतला आणि जखमी केलं असं ऐकलय का. साताऱ्यात (Satara) असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. एका गाढवाने चिमुकलीच्या डोक्याचा चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. यासगळ्या प्रकारानंतर गाढवाच्या मालकावर पोलिसांनी (Satara Police) गुन्हा दाखल केला आहे.
साताऱ्यातील खटाव तालुक्यात मायणी येथे तीन वर्षांच्या मुलीच्या डोक्याला गाढवाने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. गाढवाने चावा घेतल्यानंतर जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी कऱ्हाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गाढव मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मोकाट जनावरांबाबत परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गंभीर जखमी झालेली मुलगी हातात पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर उभा असलेल्या गाढवाने तिच्या डोक्याचा जोरदार चावा घेऊन तिला फरफटत नेले. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी तिची सुटका केली. मात्र गाढवाने त्या चिमुकलीला इतक्या जोरात चावा घेतली ती तिच्या डोक्याचे मास निघाले. त्यामुळे मुलीच्या डोक्याचा वरचा भाग रक्तबंबाळ झाला होता. जखमी झालेल्या मुलीला तात्काळ लोकांनी कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, मुंबईतही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. अशातच आता मुंबईत एका पोस्टमनवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे समोर आलं आहे. मुंबईतल्या पवई परिसरात व्हिनस इमारतीजवळ पत्र देण्यासाठी गेलेल्या पोस्टमनवर पाच भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टमन आपलं काम करण्यासाठी जात असतानाच भटक्या कुत्र्यांनी त्याला घेरलं आणि चावा घेण्यास सुरुवात केली. सुदैवाने पोस्टमन या हल्ल्यातून बचावला आहे. तिथल्या सुरक्षा रक्षकाने काठी उगारल्यानंतर कुत्री पळून गेली आणि पोस्टमनचा जीव वाचला.