विकास भोसले, झी मीडिया, सातारा: जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील चोपडी या दूर्गम गावातील अभिजित चव्हाण यानं अत्यंत गरीब परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवत यश संपादन केलं. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या चव्हाण कुटुंबाकडे अभिजितच्या या बहुमुल्य यशाचे पेढे वाटायला सुद्धा पैसे नाहीत. या परिस्थितीवर मात करत अभिजितला आय ए एस व्हायचं आहे.


यशाची साथ तरीही संघर्ष कायम...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिजित चव्हाणचे वडील अंध आणि भाऊ तसंच बहिणही अंध. घरची स्वताची जमीन नाही. त्यामुळे आई दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करते. आणि डोक्यावर कर्ज. मातंग समाजातलं हे कुटुंब झाडू केरसुणी तयार करुन उपजीविका करते. शिळ्या  चटणी भाकरी वरती दिवस ढकलणाऱ्या या कुटुंबातला अभिजीत पहाटे लवकर उठून अभ्यास करायचा. नुसता अभ्यासच नाही तर वक्तृत्व, क्रीडा, कला प्रकारातही त्यानं जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलाय.


चोपडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर बेलवडे इथल्या कोयना शिक्षण संस्थेच्या न्यू इग्लिंश स्कूलमध्ये अभिजीतनं शिक्षण घेतलं. अभिजीतच्या शिक्षणासाठी दुभती म्हैस विकण्याचा निर्णय त्याच्या आई वडिलांनी घेतला. तर त्याचा दहावीचा फॉर्म भरण्यासाठी त्याच्या आईनं आपल्या कानातली सोन्याची फुलं गहाण ठेवून पैसे आणले.


हे समजल्यावर अभिजितच्या दहावीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी त्याच्या शिक्षकांनी उचलली. शाळेच्या एकाच गणवेषावर दिवस काढत, अभिजितनं दहावीत ९३ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. खूप शिकून I A S होण्याचं त्याचं स्वप्न आहे.


स्वप्नांना मिळावे गरूडाचे पंख...


अभिजितची स्वप्नं मोठी आहेत. ती सत्यात उतरवण्याची जिद्दही त्याच्याकडे आहे. मात्र त्याच्या पालकांकडे त्यासाठीचं आर्थिक बळ नाही. म्हणून या गुणवान मुलाला त्याचं ध्येय गाठण्यासाठी समाजातल्या संवेदनशील हातांची गरज आहे.


संघर्षाला हवी साथ


गुणवंतांच्या संघर्षाला 'झी २४ तास'चा मदतीचा हात


तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा 


संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६


पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 


ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 


लोअर परळ, मुंबई - ४०००१३


ई-मेल : havisaath@gmail.com