तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातील (Satara News) फलटण शहरात हणमंत पोतेकर आणि अमित पोतेकर या पितापुत्रांचा आकस्मित मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयुर्वेदिक काढा (Ayurvedic Kadha) प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला म्हटलं जात होते. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. आयुर्वेदिक नाही तर घरगुती काढ्यामुळे दोघांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचाही विषबाधेमुळेच मृत्यू झाल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीही म्हटलं आहे. सातारा पोलिसांनी (Satara Police) या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवणानंतर घशात खवखव होवू लागल्यामुळे पोतेकर कुटुंबियांनी घरातच काढा बनवला होता. हा काढा घेतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच हणमंत पोतेकर आणि अमित पोतेकर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होते आहे. मात्र अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.


फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हनुमंत पोतेकर( वय 55) आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय 32) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले होते. त्यानंतर घशाचा त्रास होत असल्याने पोतेकर कुटुंबियांनी घरातच घरगुती काढा तयार करण्यात आला. मात्र तो काढा प्याल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव आणि अमित यांना त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पहाटे तीन वाजता हणमंतराव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांनीच अमित याचाही मृत्यू झाला. मात्र खाजगी रुग्णालयात त्यांना योग्य उपचार न मिळाल्याने दोघांचाही मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबातील व्यक्तींनी केला आहे.


दरम्यान, नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नसले तरी विषबाधेमुळेच त्यांचा जीव गेला आहे असे खाजगी रुग्णालयातील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात या पिता पुत्रांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा तपास फलटण पोलिसांनी सुरू केला असून याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


"घशात खवखव होत होती म्हणून आम्ही तिघांनी काढा घेतला होता. मला थोडा त्रास झाला म्हणून मी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या होत्या. त्यानंतर मला उलट्या आणि जुलाब झाले. त्या दोघांनाही काढा घेतल्यानंतर उलट्या आणि जुलाब सुरु झाले होते. मला रुग्णालयात जायची गरज पडली नाही. मला घरीच फरक पडला. माझी प्रकृती व्यवस्थित आहे," असे हणमंत पोतेकर यांच्या मुलीने सांगितले.