सयाजी शिंदेंना हायवेजवळची जागा कशासाठी हवीय? पोलिसांच्या पत्नींचा अभिनेत्यावर आरोप
Satara News : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या सह्याद्री देवराईच्या बायोडायव्हर्सिटी पार्कला पोलीस पत्नींचा आणि कुटुंबातील महिलांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाच्या विरोधात महिलानी पालकमंत्र्यांना निवेदन देखील दिलं आहे.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : गेल्या काही वर्षंपासून सातारा पुणे महामार्गालगत म्हसवे या गावाजवळ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचे सह्याद्री देवराईच्या (Sahyadri Deorai) माध्यमातून बायोडायव्हर्सिटी पार्क (Biodiversity Park) उभा करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एका ओसाड माळावर विविध जातीची झाडे ते लावत आहेत. परंतु ही जागा पोलीस दलाची असून ही जागा शूटिंग रेंजसाठी पोलिसांसाठी राखीव आहे.सयाजी शिंदे यांच्या प्रकलपा नंतर पोलिसांना सरावा साठी जागा मिळणार नसल्याने आता पोलीस आणि त्यांचा परिवारासह महिला पोलीस आक्रमक झाल्या आहेत. ही जागा फक्त पोलिसांची आहे आणि ती त्यांनाच मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलीस कुटुंबियांनी शनिवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले आहे. या वेळी महिलांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना राखी बांधली ओवाळणी आणि आमची जागा आम्हाला मिळवून द्या तीच आमच्यासाठी ओवाळणी असेल अशी भावनिक साद देखील घातली.
या विषयी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही जागा गोळीबार मैदानाची असून पोलिसांना शुटींगच्या सरावासाठी मिळाली आहे. शहरापासून साधारण पाच किमी लांब ही जागा आहे आणि आता आधुनिक वेपण पोलिसांकडे असल्याने सरावासाठी मोठी जागा लागत आहे. सयाजी शिंदे यांचा प्रकल्प चांगला आहे परंतु या जागेची पाहणी करून पोलिसांना अडथळा येतो की नाही हे पाहून निर्णय घेऊ शंभूराज देसाई म्हणाले.
पोलीस कुटुंबियांचे म्हणणं काय?
"पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात एक निवदेन दिलं आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवे येथे पोलीस दलाची 105 एकर जमीन आहे. या जमिनीवर शासनाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला होता. तो कोणाचाही खासगी कार्यक्रम नव्हता. त्या कार्यक्रमाक सयाजी शिंदे यांना फक्त वृक्षारोपणासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र आता ते वरिष्ठांची भेट घेऊन ही जागा माझ्या ताब्यात द्या असे सांगत आहेत. पण ही जागा सातारा पोलीस दलाची आहे. या जागेवर 300 खोल्यांच्या बांधकामांची मंजूरी आहे. फक्त निधीअभावी काम झालेलं नाही. पण ही जागा मिळावी म्हणून सयाजी शिंदे खूप प्रयत्न करत आहेत. महाबळेश्वरला ते प्रकल्प करु शकतात पण त्यांना हायवेजवळील पोलिसांचा जागा कशासाठी हवी आहे हा प्रश्न आहे. भविष्यात त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे असा डाव दिसतो आहे. ते फक्त पोलिसांच्या जागेच्या मागे लागले आहेत," असा आरोप पोलिसांच्या पत्नीनं केला आहे.
दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा प्रकल्प सुरू करताना याआधीच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करूनच हा प्रकल्प सुरू केला होता. मग नेमकं सध्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांना हा प्रकल्प का खटकला असा प्रश्न निर्माण होतो आहे.