सातारा : विधानसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांना शुक्रवारी पाहायला मिळाले. राज्यातील अनेक भागांमध्ये आज पाऊस पडत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना सभा रद्द कराव्या लागल्या. मात्र, शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यात आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा लोकसभा मतदारसंघात आज श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांचा हा उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. पवारांचे हे रूप पाहून सर्वजण भारावले. कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.


या सभेत पवारांनी उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. निवडणुकीत विरोधकच नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, आम्हाला दुसऱ्या बाजूला तोडीचे पैलवानच दिसत नाही. आमच्या नेत्यांनी आजवर अनेक पैलवान तयार केले. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोधत नाहीत. येत्या २१ तारखेला सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सर्वांना समजेल, असे पवारांनी सांगितले.



यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार एकहाती विरोधकांच्या फळीचे नेतृत्व करताना दिसत आहेत. त्यासाठी वयाच्या ८० व्या वर्षी ते राज्यभरात पायाला भिंगरी लागल्यागत फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राज्यभरात दौरा केला होता. यानंतर निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते अथकपणे सभा घेत फिरत आहेत. पवारांचा हा उत्साह मरगळ आलेल्या विरोधकांना नवी उर्जा देत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही वाकुयद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कुस्ती ही बरोबरीच्या पैलवानाशी केली जाते, लहान मुलांशी नाही, असा टोलाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही जशास तसे उत्तर दिले होते. त्यामुळे आता येत्या २४ तारखेला काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.