तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आहेत... राजकीय विषयावर किंवा लोकसभा निवडणुकीवर भाष्य करण्यासाठी नव्हे... कार्यकर्त्यांसाठी भर सभेत गाणं गाताना दिसल्यानंतर उदयनराजे भोसले चर्चेत आलेत. साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात खासदार उदयनराजेंचं कार्यकर्त्यांवरचं भरभरुन प्रेम पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांसाठी उदयनराजेंनी खास गाणंही म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा नगरपालिकेच्या पुरस्कार वितरणावेळी हा प्रसंग उपस्थितांना पाहायला मिळाला. सातारा नगरपालिकेच्या वतीने जिल्हयातील नामांकित कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक आणि पुरस्कार सोहळा आयोजित मंगळवारी करण्यात आला होता. शाहू कलामंदिर इथं पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कै. प्रतापसिंहराजे भोसले महाराज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार साताऱ्यातील जेष्ठ वकील धैर्यशील पाटील यांना देण्यात आला. यावेळी उत्कृष्ट पत्रकार आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. 


यावेळी पुरस्कारानंतर लोकांसमोर आपलं मनोगत मांडण्यासाठी उभ्या राहिलेल्या उदयनराजे भोसलेंनी नेहमीप्रमाणे आपली एक वेगळीच बाजू लोकांसमोर उघड करत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. उदयनराजे भोसले यांनी आपल्या खास शैलीत आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक गाणं म्हटलं. हे गाणं होतं, 'हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जाणते'...


काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर तयार केलेलं गाणं ऐकून भारावून गेलेले आणि डोळ्यांत पाणी तरळलेले उदयनराजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिले होते... त्यांना आपल्या शर्टाच्या बाहीनं डोळे पुसताना पाहून कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. 'राष्ट्रात एक, हृदयाचा नेक... नाद नाय राजेंचा करायचा...' असं ते गाणं होतं. 


अधिक वाचा :- व्हिडिओ : ... आणि उदयनराजेंच्या डोळ्यांतून टचकन पाणी आलं!