Success Story: बुलढाणा टू युके... मेंढपाळ पुत्राच्या जिद्दीची उंच भरारी!
Buldhana News: महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वच्छता मिञ पुरस्कार देखील सौरभ हटकरला (Saurabh hatkar) मिळाला होता. एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यात देखील सौरभचा मोलाचा वाटा राहिला आहे.
Success Story: बुलढाणा जिल्हामधील (Buldhana) खामगांव तालुक्यातील हिवरखेड नावाचं गाव. या गावात मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या सौरभ हटकर या तरूणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर उंच भरारी घेतलीये. मेंढपाळ लोकांच्या अधिकारसाठी लढणाऱ्या सौरभला परदेशात शिक्षणाची संधी मिळाली आहे. जगातील रिसर्च मध्ये जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर असलेल्या एडिनबर्ग विद्यापीठामध्ये (University of Edinburgh) साऊथ एशियन स्टडीजच्या साथीने पीएचडी कोर्ससाठी सौरभची निवड झाली आहे. यामध्ये तो मेंढपाळ समुहाच्या संघर्षावर आधारित संशोधन करणार आहे.
डेव्हलपमेंट स्टडीज या सेक्टरमध्ये जगातील क्रमांक एकचे असलेले ससेकक्स विद्यापीठ (niversity of Sussex) अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या संस्थेत पॉवर, सहभाग, सामाजिक बदल या मास्टरकोर्स साठीही सौरभची निवड करण्यात आली आहे. त्याच्या यशाचा हा आनंद त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यात मावेना झालाय. लहानपणापासून मेंढपाळ लोकांचे हाल पाहत असल्याने सौरभने वेगवेगळ्या मंचावरून आवाज उठवला आणि आंदोलनं देखील केली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वच्छता मिञ पुरस्कार देखील सौरभला मिळाला होता. एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यात देखील सौरभचा मोलाचा वाटा राहिला आहे.
अहिल्यादेवी होळकर, फुले-शाहु-आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांच्यावर आधारित 200 हून अधिक सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत. एवढंच नव्हे तर मेंढपाळ पुत्र आर्मी नावाची मेंढपाळ तरुणांसाठी राज्यातील पहिली संघटना सौरभने उभी केली आणि हक्कांसाठी संघर्ष केला. मेंढपाळ चराई अधिकार हक्कांसाठी, आरोळी मोर्चा, मेंढपाळ टपाल सत्याग्रह, हिवाळी अधिवेशन मोर्चासारखे अभिनव आंदोलन केले आहेत. हिवाळी अधिवेशन येथे 19 डिसेंबर रोजी मेंढपाळ लोकांचा चराऊ कुरणांच्या अधिकारसाठी भव्य मोर्चा सुद्धा काढला होता. मेंढपाळ टपाल सत्याग्रह माध्यमातून सौरभने तब्बल 12,000 पेक्षा जास्त पत्रं चराऊ कुरणांच्या अधिकार संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविली आहेत.
दरम्यान, सौरभ हटकरने मागील सहा वर्षांपासून केलेल्या आंदोलनामध्ये भटक्या मेंढपाळ समुहासाठी स्वतंत्र स्कॉलरशिप, फेलोशिप असायला हव्यात, अशा मागण्या केलेल्या आहेत. मात्र, त्यावर ठोस निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. धनगर समाज भुषण 2017 औरंगाबादचा मानकरी ठरलेल्या सौरभचं हे हे यश उपेक्षित समूहाचे आत्मभान उंचवणारे असून, मेंढपाळ आणि भटक्या समूहाला उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणारं आहे. माझं हे यश भटक्या आणि मेंढपाळ समूहाला अर्पित करतो, असं म्हणत त्याने सर्वांचे आभार देखील मानले आहेत.