चंद्रशेखऱ भुयार, झी मीडिया, बदलापूर : दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा शाळेच्या बसचालकाने लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय. एवढंच नाही तर प्रकाराबाबत जाब विचारायला गेलेल्या पीडित मुलाच्या पालकाला बसचालकाने आपल्या चार साथीदारांसह बेदम मारहाण केलीय.


काय आहे प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या दुसरीतल्या विद्यार्थ्याशी स्कूल बस चालकाने अश्लील चाळे केले. शाळेचा बसचालक रवी लवाटे हे प्रकार करत होता. त्यामुळे घाबरलेला विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत होता.


या घटनेनंतर पालकांनी पीडित मुलाची बसही बदलली होती. मात्र बस बदलल्यावरही लवाटे या विद्यार्थ्याकडे रागाने पाहात असे. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना रवी लवाटे आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर जखमी पालकाला उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर रवी लवाटेविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. 


पालकांनी शाळेत तक्रार केली?


या प्रकरणी पालकाने केवळ बस चालकाकडे तक्रार करण्याऐवजी शाळेकडे तक्रार नोंदवणं गरजेचं होतं असं शाळेच्या प्रशासनाने म्हटलंय.  


या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. रात्री उशीरा गुन्हा दाखल झालाय मात्र अजून लवाटेच्या मुसक्या आवळलेल्या नाहीत यावरून पोलीसही कितपत गंभीर आहेत हे दिसून येतंय.